Tanaji Sawant : मराठा आरक्षणावरुन आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर माफी मागितली आहे. एबीपी माझाशी बातचीत करताना तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागतो असतं म्हटलं. "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) विषयाची खाज का?", असं वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं होतं. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. मात्र जर माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं म्हणत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. 


मराठा आरक्षण मिळालं त्यानुसार अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र महाविकास आघाडीचं सरकार असताना सहा महिन्यात आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यावेळी रद्द झालेल्या आरक्षणावर कोणीही मोर्चा काढला नाही, आंदोलनाची भाषा केली नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांशी आमच्या चर्चा सुरु होत्या. आरक्षण मिळवण्यासाठी काय करायला हवं? याचा विचार करत होतो. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यावरच यांनी आंदोलनाची भाषा सुरु केली. यामागे कोणाचा हात आहे हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केला आहे.


"मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मात्र आम्हाला टिकाऊ आरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. यासंदर्भात आमच्या बैठका सुरु आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. सगळ्यांशी बोलून चर्चा करुन याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत," असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 


महाविकास आघाडीचं सरकार असताना आरक्षणासाठीदेखील आम्ही प्रयत्न केले. मी देखील त्या सरकारचा भाग होतो मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नव्हता ही आमची शोकांतिका होती. आम्ही आमचं मत त्यावेळी देखील वारंवार बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळायला हवं ही भूमिका त्यावेळी देखील होती आणि त्यावर आजची ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रद्द न होणारं शैक्षणिक आणि आर्थिक टिकाऊ आरक्षण हवं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


"मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला की मी मराठा समाजाची बदनामी करतो. मात्र ते देखील माझेच बांधव आहेत त्यांचीही मी माफी मागतो. सत्ताबदल झाल्यानंतर मी माझी भूमिका बदलत नाही आहे. आम्हाला आरक्षण हवं आहे त्यासाठी प्रयत्नशील आहे," असं त्यांनी म्हटलं आहे. 


काय होतं वादग्रस्त वक्तव्य?
यापूर्वी दुट्टपी राजकारणात मराठा आरक्षण अडकलं होतं. मात्र आमच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच बाहेर काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी उस्मानाबादमधील कार्यकर्ता मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर मराठा समाजाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.