पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कोणत्याही व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा किंवा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी करणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. यामुळे आता पीएफआय कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब कट रचणे, दोन धर्मात तेढ निर्माण करणे अशा कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याला मे महिन्यात स्थगिती दिली होती. यामुळे कोणत्याही व्यक्ती विरुद्ध राजद्रोहाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान जिंदाबाद या व्हायरल व्हिडिओ नंतर आज पुणे पोलिसांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांच्यावर इतर तीन कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा व्हिडीओ फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती समजणार आहे.
काय आहे प्रकरण?
चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएने पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. त्यानंतर पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पुणे पोलिसांनी 41 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सर्व म्हणजे 41 जणांना जामीन मिळाला . पण नंतर या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यावर पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर नवीन गुन्हे दाखल केले.
दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि कट रचणे असे आरोप ठेवत पुणे पोलिसांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :