Swarada Bapat : गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा आता सुरु झाली आहे. गिरीश बापटांच्या सून स्वरदा बापट यांनी पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडायला आवडेल, असं म्हणत लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली. भाजपमध्ये इच्छुकांची मोठी संख्या पाहता उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षासमोर मोठा प्रश्न आहे तर तिकडे कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा केला जात आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.


कसब्यापाठोपाठ आता लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे पुण्यात वाहायला लागले आहे. भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला दीड महिना उलटल्यानंतर उमेदवारीवरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. गिरीश बापटांचे चिरंजीव गौरव आणि सून स्वरदा यांनी पक्षाने जबाबदारी दिल्यास पार पाडायला आवडेल असं म्हणत इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


भाजपकडे इच्छुकांची मोठी फौज 


या पोटनिवडणुकीसाठी पुणे भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. त्यात स्वरदा बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी अशी भाजपकडे इच्छुकांची मोठी फौज आहे. मात्र यातून एकाची निवड करणं सोपं नाही. त्यामुळे भाजपचं नेतृत्व यावर बोलण्याचं टाळत आहे. कसब्यात उमेदवार चुकल्याने भाजपला हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपला खूप विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.


कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही तू तू मैं मैं


दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील ही जागा लढवण्यावरुन तू तू मैं मैं पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष कॉंग्रेसकडून लढवण्यावरुन येणारी ही जागा आम्हीच लढवणार असं कॉंग्रेस नेते म्हणत आहे. तर पुणे शहरात आमची ताकद वाढल्याने ही आम्हाला मिळायला हवी, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आली असून सत्ता न मिळाल्यास ती अस्तित्वात राहणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. 


एकीकडे उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झालेली असताना जिल्हा प्रशासनाकडून पोटनिवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. नियमानुसार निवडणूक आयोगाला ही पोटनिवडणूक घेणं भाग आहे. मात्र या निवडणुकीतील राजकीय गुंतागुंत पाहता राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक कस पाहणारी ठरणार आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या काही महिने आधी ही पोटनिवडणूक होणार असल्याने ती ट्रेन्ड सेटर ठरणार आहे आणि म्हणूनच ती अतिशय चुरशीने लढली जाणार आहे.