Rupali Thombre on Ravindra Dhangekar Allegations: पुणे : पुणे पोर्शे अपघात (Pune Porsche Accident ) प्रकरणी रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी जे काही आरोप केलेत, ते सर्वच्या सर्व आरोप केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. तसेच, अंधारे आणि धंगेकरांनी जे काही आरोप केले आहेत, ते सर्व आरोप केवळ ऐकीव माहितीच्या आधारे करण्यात आले आहेत, जर असा भ्रष्टाचार कुणी करत असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत, त्यांच्यावर  कारवाई एका मिनिटात केली जाईल, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी एक्साईज ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना रेटकार्ड वाचून दाखवलं होतं. तसेच, कारवाई करण्याची मागणीही केली होती. 


अंधारे आणि धंगेकरांनी केलेले आरोप केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर : रुपाली ठोंबरे 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, "सुषमाताई अंधारे आणि आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांनी जे काय आरोप केले ते सवंग प्रसिध्दीसाठी केल्याचे स्पष्टपणे दिसून येतं, कारण की जे आरोप केले त्यांनी ते ऐकीव माहितीच्या आधारे केलेले आहेत. जर असं कुठलाही प्रकारचा कोण भ्रष्टाचारी असेल तर हे असेल तर त्यांनी पुरावे द्यावे, कारवाई एका मिनिटात केली जाईल महायुती सक्षम सरकार आहे, अजित दादांची तर कारवाईची पद्धत तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे ते काही वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु केवळ फक्त ऐकूव माहितीच्या आधारे असे आरोप करणं चुकीचे आहे. त्याच्यामुळे पुण्यातील अधिकारी भ्रष्ट ठरवून एक प्रकारे पुणेकरांची बदनामी करत आहे हे अत्यंत चुकीचे आहे."



तुम्ही सगळ्यांची दिशाभूल करताय, त्यामुळे तुम्ही फक्त एक पुरावा द्यावा : रुपाली ठोंबरे 


"आता त्याबद्दल पुढे सांगायचं म्हटलं तर लोकशाहीमध्ये सगळ्या यंत्रणा आहेत,यंत्रणा काम करतात, कुठल्या यंत्रणावर दबाव असेल, तर कुणी दबाव टाकला ते पण आपण सांगाव पण तेही न सांगता केवळ फक्त सवंग प्रसिद्धीसाठी खोटे नाटे आरोप करून ऐकीव माहितीच्या आधारे सांगून आरोप करून आपण सगळ्यांची दिशाभूल करत आहात. त्यामुळे आपण फक्त एक पुरावा द्यावा की कुठला अधिकारी किती पैसे कुणाकडून घेत होता,कुठला बारवाला कुणाला पैसे देत होता याचा एक सिंगल पुरावा दयावा, एक तक्रारी अर्ज दयावा सरकारने जर नाही कारवाई केली तर मग बोलावं परंतु हे असले बेछूट आरोप करणं हे बंद करावं.", असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत. 


 "पुण्यातील विषय न्यायालयात आहे पोलिसांनी जे दोषी डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा पकडले आहे  याच्यावरून आपल्याला स्पष्टपणे सिद्ध होतं याच्यामध्ये पुणे पोलीस आयुक्त,महायुतीचं सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही जर पाठीशी घालत असते एवढ्या लोकांना अटक झाली नसती फक्त तो मुलगा जो नातू आहे त्याच्यावर कारवाईहून हा विषय संपला असता,परंतु त्याचे वडील त्याचे आजोबा त्यांच्यावर झालेल्या केसेस इतर केसेस त्यांना सांभाळणारी लोक या केस मध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली ह्या सर्वांना पोलिसांनी अटक केलेले आहे.आणि अजून देखील याचा तपास संपलेला नाही,तपास चालू परंतु त्या प्रथम तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं तपासामध्ये ढवळाढवळ करण, हे जे काही विरोधकांकडून चालू हे केवळ फक्त प्रसिद्धी साठी चालू आहे. त्याच्यामध्ये कुठलेही सत्य नाही,एकही पुरावा दिला नाही.", असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत. 


रुपाली ठोंबरे यांनी बोलताना सांगितलं की, "अजून पुन्हा एकदा सांगते जर काही अशा प्रकारचे एक सिंगल कुठलाही पुरावा त्यांनी दयावा,जर कारवाई केली नाही तर मग त्यांना बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आणि शेवटचं सांगते यावरून सुद्धा जर रविभाऊ धंगेकरआणि सुषमाताईचे समाधान नाही झालं तर या दोघांना चौकशी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष करून यांनीच खटला चालवावा आणि यांनीच दोषींना फाशी द्यावी. मगच लोकशाहीचा विजय होईल."