Pune Supriya Sule :  बिचाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकीपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात. तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya sule) भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी तसेच विविध नवीन योजनांच्या भूमिपूजनासाठी आज मुंबई दौऱ्यावर  आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच करतो. भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहेत. मात्र आज यांच्यासारखे नेते भाजपमध्ये नाहीत. याचे वाईट वाटते, असंही त्या म्हणाल्या. 

देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला

राज्यात सर्वाधिक उद्योग आले आहेत. अनेक आकडेवारीमधून समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधान करणे योग्य नसून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. हे लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे कसे कमी होतील. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती

मुख्यमंत्री दावोसमध्ये गेले होते. त्यांनी मोठी गुंतवणूक आणली आहे. मात्र त्यांनी तिकडे जाण्यापेक्षा हैद्राबादला जायला हवं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती.ते उद्योजक हैदराबाद येथून मुंबईत आले असते आणि तिथे करार झाले असते, अशी टीकाही  सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर केली आहे.

अब्दुल सत्तांरांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या...

काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच ते बारामतीत कृषि प्रदर्शनासाठी बारामतीला हजर राहिले. त्यांनादेखील सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीत येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत केलं जातं. त्यामुळे अतिथी देवो भवं असं म्हणत त्यांनी अब्दुल सत्तारांना उत्तर दिलं आहे.