Pune G-20 Summit : पुण्यात दोन दिवस जी-20 परिषद (Pune G-20) पार पडली. यानिमित्तानं संपूर्ण शहराला उत्सवाचं रुप आलं होतं. या परिषदेसाठी सरकारकडून मोठा तामझाम करण्यात आला होता. पुण्यातील चौकाचौकांचं सुशोभिकरण करण्यात आलं होतं. परदेशी पाहुण्यांच्या प्रत्येक गोष्टींची बारकाईनं काळजी घेतली गेली. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे विद्यापीठात या पाहुण्यांनी महाराष्ट्रातील संस्कृती कशी आहे? यासंदर्भात माहिती घेतली आणि लेझीमवर ठेकाही धरला, मात्र या जी-20परिषदेतून पुण्यातील पायाभूत सुविधांबाबत ठोस आराखडासमोर आला नाही.


पुण्याच्या जी -20 परिषदेत पाच मुद्यांवर चर्चा करण्यात आली
 

- शहरं शाश्वत कशी बनवायची?
- शहरं लवचिक कशी बनवता येतील?
- समावेशक कशी करता येतील?
- शहरांच्या आर्थिक गरजा काय आहेत?
- लोककेंद्रित दृष्टीकोन आणि गतिमान दृष्टिकोनाने शहरांचे नियोजन कसे करावे?
 मात्र यातून धोरणात्मक निर्णय समोर आला नाही. 


चकाचक शहर पाहून पुणेकर अचंबित


पुण्यात जी-20 परिषद होणार आहे. हे पुणेकरांना रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळं समजलं. प्रत्येक चौक साफ करण्यात येत होते. सगळे रस्ते चकाचक करण्यात आले. मोठ मोठे रंगीबेरंगी झेंडे लावण्यात आले. हेच नाही तर शहर सुंदर दिसावं म्हणून शहरातील उकीरडे देखील झाकले गेले होते. या कामावरुन पुणेकरांनी आपल्या शैलीत टीकाही केली. सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले. शहरातील स्थानिक नेत्यांनी देखील टीका केली. एवढंच नाही तर सोशल मीडियावर मीम्सदेखील शेअर करण्यात आले होते. 


60 कोटी रुपयांचा खर्च


या सगळ्यासाठी केलेल्या खर्चाची किंमत जर तुम्हाला सांगितली तर अनेक पुणेकरांनी बोटं तोंडात जातील. राज्य सरकारने या जी-20 च्या कामासाठी 10, 20  नाही तर तब्बल 60 कोटी दिले होते. शिवाय 40 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांना या कामांचं कंत्राट दिलं होतं आणि त्याच बरोबर बिल्डर्सला जाहिराती लावण्याची मुभाही देण्यात आली होती. एवढा सगळा जी-20 साठी पुण्यात घाट घालण्यात आला होता. मात्र जी 20 परिषदेचा चर्चेचा विषय पायाभूत सुविधा होता.  त्यामुळे पुण्याच्या ट्राफिकसह अन्य अनेक ज्वलंत प्रश्नांवर मात्र कुठलाही ठोस निर्णय समोर आला नाही आणि कृती आराखडाही समोर आला नाही. त्यामुळे जी-20  परिषदेत नेमकं काय चर्चा झाली आणि कोणते निर्णय घेण्यात आले, यावर प्रश्नचिन्हच आहे.