Pune Fire : उरवडे येथील कांजने नगर येथे राहणाऱ्या गीता दिवाडकर यांचाही पुण्याचील भीषण आग दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती भारत दिवाडकर, दोन मुलं शुभम आणि मिलिंद दिवाडकर आणि सासूबाई कलावती दिवाडकर असं कुटुंब आहे. 9 महिन्यांपूर्वीच गीता दिवाडकर svs कंपनीत कामाला लागल्या होत्या. 
 
मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं म्हणून त्या इथं काम करत होत्या. सध्या महाविद्यालयं बंद असल्यामुळे मुलं तात्पुरत्या स्वरुपातील नोकरी करत आहेत. दररोज त्यांचा मोठा मुलगा आईला कंपनीत सोडायला जायचा. प्रामाणिकपणे काम करुन त्यांचा संसार सुरु होता. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या असणाऱ्या गीता यांचा असा अपघाती मृत्यू होणं धक्कादायक आहे.


गीता यांनी कष्ट करुन मुलांना मोठं केलं, हाताशी आलेली मुलं पाहून गीता यांना कायम समाधान वाटत होतं. पण असं अचानक काहीतरी घडेल याचा विचारही त्यांच्या कुटुंबाने केला नव्हता. घर ते कंपनी असा 3 ते 4 किमीचा प्रवासही त्या बऱ्याचदा पायी करायच्या, सोमवारी नेहमीप्रमाणे घरातील सगळी कामं आवरुन त्या कंपनीत निघाल्या आणि कधीही परत न येण्यासाठी. त्यांच्या कुटुंबावर नियतीनं घातलेला घाला आणि त्यांच्यावर कोसळलेलं संकट शब्दांतही व्यक्त न करता येणारं आहे. 


Pune Fire :  आग लागली तेव्हा सर्वजण आपला जीव वाचवून पळत होते; प्रत्यक्षदर्शी सुरक्षा रक्षकाची माहिती 
 
आग दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू 
पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कर्मचारी होते अशी माहिती समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. पण काहींना मात्र या दुर्घटनेच आपले प्राण गमवावे लागले. 


केंद्र आणि राज्य शासनाकडून या दुर्घनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यासंबीधी सांगण्यात आलं आहे. या दुर्घटनेबाबत कंपनीचे सुरक्षा रक्षक राजकमल यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती दिली.