पिंपरी-चिंचवड: काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद काही संपण्याचं नाव दिसत नाही. अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शब्दाचे बाण सोडणं सुरु असताना आता त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही उडी घेतली आहे.
'मी जर चौकशीचे आदेश दिले असते, तर काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री अडचणीत आले असते आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून संपला असता', अशा आशयाचं विधान मुख्यमंत्रीपदाचा काळ संपत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्याचं आधी चव्हाणांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी सुनील तटकरे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असंही यावेळी तटकरे म्हणाले. तसंच अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की, 'अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कधीच नव्हती. पण त्याचा दुरुपयोग होत असेल तर त्याच्या तरतुदीचा विचार करावा.'