Sunil Tatkare on Asha Buchake: राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी  (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ स्टंटबाजी, म्हणत रूपाली चाकणकरांनी बुचकेंची खिल्ली उडवली आहे, तर महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी, अशी कठोर भूमिका सुनील तटकरेंनी घेतली आहे.


महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी - सुनील तटकरे


महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अशी कठोर भूमिका घेतली आहे. अनेक जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात. त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत. मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात. असा आक्षेप कशासाठी? भाजपच्या नेत्या आशा बुचकेंच्या या टीकेला उत्तर देण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणार असल्याचं तटकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख केला जात नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. महायुतीत कोणताही दुरावा निर्माण झालेला नाही. असं ही तटकरे म्हणालेत.


अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ स्टंटबाजी - रूपाली चाकणकर


भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचकेंनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, ही निव्वळ एक स्टंटबाजी होती, असं म्हणत अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बुचकेंची खिल्ली उडवली आहे. काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजित दादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली असती. पण केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली, असा पलटवार चाकणकरांनी केला आहे. 


बुचकेंच्या या भूमिकेने महायुतीत कोणताही खडा पडणार नाही, असा दावा ही चाकणकरांनी केला आहे. ही राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा असल्यानं अजित दादांनी ही बैठक बोलावली होती. जागच्या-जागी समस्यांचं निराकरण व्हावं म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना बोलावलं होतं, याचा अर्थ ही शासकीय बैठक होती असा होत नाही, असंही चाकणकरांनी स्पष्ट केलं आहे. विरोधातील काही नेत्यांना फक्त आमच्यावर बोलण्यात रस आहे, आम्ही अशा आरोपांना थारा देत नाही. जनसन्मान यात्रेच्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी महायुतीचा बैठक होत आली आहे आणि ती यापुढं ही होईल, असा विश्वास चाकणकरांनी व्यक्त केला आहे.


नेमकं काय घडलं? 


जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. गिरीष बापट जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी लेण्यांचा विकास केला. केंद्रापर्यंत त्यांच्या बैठका झाल्या. पर्यटनासाठी आम्ही देखील प्रयत्न केले आहेत, या बैठकीत आम्हालाही सहभागी करून घेणं पालकमंत्र्याचं काम आहे, असंही आशा बुचकेंनी  (Asha Buchake) यावेळी म्हटलं आहे.