Asha Buchake: राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी  (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे. 


कारण आज जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशा बुचकेंनी पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलं. देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. असं म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी  (Asha Buchake) शड्डू ठोकला आहे. 


शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचकेंनी  (Asha Buchake)केला आहे, अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत बुचकेंनी  (Asha Buchake)अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे.


काय म्हणाल्या आशा बुचके? 


जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. गिरीष बापट जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी लेण्यांचा विकास केला. केंद्रापर्यंत त्यांच्या बैठका झाल्या. पर्यटनासाठी आम्ही देखील प्रयत्न केले आहेत, या बैठकीत आम्हालाही सहभागी करून घेणं पालकमंत्र्याचं काम आहे, असंही आशा बुचकेंनी  (Asha Buchake) यावेळी म्हटलं आहे.


कोण आहेत आशा बुचके?


आशा बुचके भाजपच्या नेत्या आहेत, शिवसेनेतून त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. शिवसेनेच्या तिकिटावर दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य ही आहेत. यंदाची विधानसभा लढण्यास ही त्या इच्छुक आहेत. शिवसेना फुटण्यापूर्वी त्या भाजपमध्ये आल्या होत्या. भाजपच्या आशा बुचके  (Asha Buchake) यांच्याकडे जुन्नर विधानसभा प्रमुख हे पद आहे.


आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं


भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके  (Asha Buchake)काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. त्यानंतर त्या आणि कार्यकर्ते तिथेच बसून राहिले, यानंतर आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.