पुणे : बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे केल्या अनेक दशकापासून रुजलेलं समीकरण. पण आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पवार कुटुंबातीलच उमेदवार दिला जाऊ शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यासाठी उमेदवार असू शकतात त्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar).  


ज्या बहिणीला निवडून आणण्यासाठी याआधी अजित पवारांनी मते मागितली, त्याच बहिणीला पाडण्यासाठी अजित पवारांनी आता कंबर कसली आहे. दोन दिवसापूर्वी बारामतीत अजित पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेला त्यांना आणि विधानसभेला मला मतदान करणार असाल तर दोन्ही वेळेस मतदान त्यांनाच करा असं म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे रणशिंग फुंकले. 


सुनेत्रा पवार याच उमेदवार असण्याची शक्यता


या अजित पवारांच्या वक्तव्यापासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली उमेदवार कोण असणार याची. अजित पवार लवकरच उमेदवार जाहीर करणार आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असण्याची जास्त शक्यता आहे. तशी चर्चा देखील रंगू लागली आहे आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.


सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील यासंदर्भात सुतोवाच केला आणि अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार असू शकतो असे देखील सांगितलं.


सुनेत्रा पवार, जय पवार मतदारसंघात अॅक्टिव्ह


सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात हळदी-कुंकवाच्या माध्यमातून महिलांची संवाद साधत आहेत. तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात खासदार सुनेत्रा पवार यांचा वावर वाढला आहे. सोबतच जय पवार देखील मतदारसंघात अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ननंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळू शकतो. 


बारामतीकर काय करणार? 


गेली अनेक दशकं बारामती लोकसभा मतदारसंघावरती पवारांचे वर्चस्व आहे. जर खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा असेल तर पवार कुटुंबातीलच उमेदवार असावा असं सांगण्यात येत आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांची चर्चा जोर धरू लागली आहे. अजित पवारांनी शरद पवारांवर केलेली टीका हे बारामतीकर कसे घेतात आणि अजित पवारांनी थेट शरद पवारांना दिलेला आव्हान याचा नेमका कसा अर्थ लावतात यावरती सर्वकाही अवलंबून असेल. 


पाच दशकांनंतर एकसंघ पवार कुटुंब फुटलं


देशात आणि राज्यात अनेक राजकीय घराणे फुटली, कालांतराने ती एकमेकांपुढं निवडणुकीत उभी ठाकली. पण त्याला पवार कुटुंब अपवाद होतं. जवळपास पाच दशकं कुटुंब एकसंघ ठेवण्यात शरद पवारांना यश आलं होतं. पण 2023 मध्ये अजित पवारांनी काकांपासून फारकत घेत बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार असल्याचे सांगत काकांविरोधात दंड थोपटले. 


राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. एका गटाचा उमेदवार जाहीर आहे, पण दुसऱ्या गटाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पण सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरते आहे. आता थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार सुनेत्रा पवार उमेदवार असणार का? आणि असतील तर सुनेत्रा पवार या नंदेला चित करणार का हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.


ही बातमी वाचा: