Sharad Pawar Steps Down as NCP Chief : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं. या घोषणेमुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी भावनिक आवाहन केले. पवारांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुध्दा आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यातच पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी शरद पवारांची मनधरणी करणार आहे, अशी माहिती पुण्यातील मावळचे आमदार सुनील शेळकेंनी दिली आहे.
यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू असून आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शरद पवार निर्णयावर ठाम राहणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर पक्षाच्या अक्षध्यपदी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे विराजमान होतील. या चर्चांना वेग आला आहे.
असं असलं तरीही राष्ट्रवादीपक्षाच्या अनेक नेत्यांना किंवा आमदारांना शरद पवारांचा हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे ते सगळे त्यांची मनधरणी करणार आहे. त्यांना विनंती करणार आहे. त्यासोबतच शरद पवार यांनी राजीनाम्याना निर्णय न घेता त्यांनी इतर कामांसाठी कार्याध्यक्ष नेमावा, अशी अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छा आहे. हे सगळे नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नव्या अध्यक्षाच्या पाठिशी- अण्णा बनसोडे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जो कोणी असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं मत पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण यावर तर्कवितर्क लावण्यात येत आहे. त्यात सुप्रिया सुळे यांच्या नावाचा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असं असलं तरीही राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व कोणीही केलं तर त्यांना आम्ही आणि सगळे पदाधितारी साथ देणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चा रंगत आहे. मात्र मागील 20 वर्षापांसून याच पक्षात काम करत आहे. त्यामुळे कोणतीही गटबाजी निदर्शनास आली नाही आहे. आम्ही सर्व नेते शरद पवार यांना मानतो. आतापर्यंत असा कोणताही गट नाही किंवा तसं राजकारण नाही, असं बनसोडे यांनी स्पष्ट केलं आहे.