बारामती : पुण्यातील कोयता गँगची दहशत सुरुच असतानाच बारामतीमध्ये (Baramati Student Murder) तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओंकार पोळ (रा. जेऊर, ता. करमाळा जि. सोलापूर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी अल्पवयीन असून एकजण फरार आहे. हे विद्यार्थी बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावीला शिकत होते. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या कृत्याने बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे.
एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्यावरून दोघांमध्ये वाद
बारामती पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे.खून झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मयत ओंकार सोलापूर जिल्ह्यातील असून शिक्षणासाठी बारामती शहरात आला होता. एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर पार्किंगमध्येही वाद झाला होता.
कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही
दुसरीकडे, दिवसाढवळ्या खून होत असताना तसेच महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये वर्दळ असताना सुद्धा विद्यार्थ्याच्या मदतीला कोणी सुद्धा धावून आलं नाही. त्यामुळे माणुसकीच हरवून गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला अनेक विद्यार्थ्यांची, शिक्षकांची तसेच सुरक्षारक्षक सुद्धा देखील ये जा असते. मात्र, त्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत असताना त्यामध्ये कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो
दरम्यान, खूनाच्या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो आणि खून करतो अशी स्थिती आहे. गृहमंत्री महोदयांच्या अपयशामुळे महाराष्ट्रात सुरु झालेले हे गुंडाराज राज्याला अनेक वर्षे मागे घेऊन गेले, ही वस्तुस्थिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या