पुणे : सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे. 


संभाजीराजे आज सिंधुदुर्गमध्ये आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराचे वादळामुळे जे नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे जाणार होते. पण समुद्र खवळलेला असल्यानं ते किल्ल्यावर जाऊ शकले नाहीत. मात्र त्यानंतर ते सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि काही व्यक्तींना भेटले असता त्या भेटीवेळी राज्य गुप्तचर विभागाचे पोलीस कर्मचारी साध्या वेषात उपस्थित राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शनिवारी संभाजीराजेंनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी देखील साध्या वेशातील पोलीस उपस्थित होते, असा दावा संभाजीराजे यांनी केला आहे. 






गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले


छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. माझी संभाजीराजे यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संगितलं आहे.