पिंपरी चिंचवड : भाजप आमदार महेश लांडगे यांनी कोरोना नियमांची पायमल्ली केलीये. मुलीच्या विवाह प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी बेफाम होत डान्स केला. मग हे प्रकरण भोवलं आणि याप्रकरणी आमदारांसह 20 जणांवर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर मात्र त्यांनी कन्येचा विवाहसोहळा अगदी थोडक्यात उरकण्याची वेळ आली. पुण्यातील देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 'साक्षी'ने त्यांनी हे लग्न संपन्न केलं. डान्स प्रकरणी दिवसभर राज्यात चांगलीच चर्चा रंगली. मग आमदारांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं. यात भोवलेल्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करण्यात आली. शिवाय यावर पडदा टाकण्यासाठी असं पाऊल उचलण्यात आल्याचं अप्रत्यक्षपणे म्हणण्यात आलं. खरं तर 6 जूनला हा विवाहसोहळा संपन्न होणार होता. पण लॉकडाऊन वाढविल्याने परवानगी मिळणार नाही, हे ही यामागचे कारण असल्याचं त्यात नमूद आहे.
भाजप आमदार लांडगे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी रविवारी मांडव डळाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाजंत्री, बैलगाडी काही बैलजोड्या मागविण्यात आल्या होत्या. तेंव्हा भंडाऱ्याची उधळण ही झाली. यावेळी आमदार लांडगे यांनी बेफाम होऊन डान्स केला. नंतर डीजे वर ही ताल धरण्यात आला. मात्र आमदारांसह उपस्थित विनामस्क वावरले. शिवाय सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला. याच्या बातम्या प्रसारित झाल्या, मग आमदारांना हे प्रकरण चांगलेच भोवले. भोसरी पोलिसांनी आमदारांसह साठ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर सहा जून ला होणारं लग्न तातडीनं उरकण्यात आला. लॉकडाऊन वाढल्याने लग्नाला परवानगी मिळणार नाही, असं कारण पुढं करण्यात आलं आणि पुण्यातील देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 'साक्षी'ने साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यानंतर घडल्या प्रकारावर आमदारांचे बंधू सचिन लांडगे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
मांडव डहाळे कार्यक्रमात उपस्थितांसोबत ठेका धरल्यानंतर आमदार लांडगे यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले आहे. तसेच गर्दी जमवून कोरोना प्रसार होईल, असे वर्तन केले आहे. असा आरोप पोलिसांचा आहे. राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आमदार आणि श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीबांना वेगळा न्याय का? असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित करण्यात येत होता. वास्तविक, हा विवाह सोहळा ६ जून रोजी होणार होता. राजस्थान किंवा गोवा येथे विवाह पार पाडण्याचं नियोजन होतं. मात्र लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करण्यात मर्यादा आल्या होत्या. म्हणूनच ३० तारखेला मांडव डहाळे आणि ३१ तारखेला विवाह असे नियोजन करण्यात आले होते. तसेच मांडव डहाळे समारंभासाठी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली होती. नियमानुसार पंचवीस आप्तेष्ठांना निमंत्रित केले होते. कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आनंद साजरा करत होतो. मात्र, समारंभ ठिकाणी अचानकपणे काही कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहीले. त्यामुळे गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमावली अर्थात सोशल डिस्टंन्सींगच्या नियमाचे उल्लंघन झाले. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे हा आमचा हेतू नव्हता. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे. प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईची पूर्तता आम्ही करणार आहोत. प्रशासनाला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही सचिन लांडगे यांनी म्हटले आहे.