पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी सात ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील कपड्यांचे दुकाने, सराफ व्यवसायिकांचे दुकानं उद्यापासून सुरू होणार आहेत.
पुण्यात निर्बंधांमध्ये काय सवलत देण्यात आलीय?
- पुण्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकानं सुरू राहणार.
- शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते दोन या कालावधीत फक्त आत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार. बाकी दुकाने बंद राहणार
- पी एम टी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार
- हॉटेल्स बंद राहणार मात्र पार्सल सुविधा सुरू
- उद्याने बंद राहणार
- सरकारी कार्यालयं पन्नास टक्के कर्मचारी संख्येने सुरु राहतील.
- मद्याची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.
- दुपारी तीननंतर मात्र संचारबंदी राहील.
- अत्यावश्यक सुविधा वगळून इतरांना तीननंतर बाहेर पडण्यास मनाई असेल.
पुण्यात गेल्या 24 तासात केवळ 180 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात एकूण 4439 चाचण्या, तर गेल्या 24 तासात 751 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. पुणे शहरातील 24 तर बाहेरील अशा 33 जणांचा मृत्यू झाला असून सध्या शहरात 6020 अक्टिव्ह रुग्ण आहे.
पिंपरी चिंचवड : 1 जून ते 10 जूनसाठी नवी नियमावली काय सुरू काय बंद?
- अत्यावश्यक दुकानांशिवाय इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
- सर्व बँका खुल्या असणार
- हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
- मद्यविक्रीची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 खुली राहणार
- ई कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची घरपोच सेवा करण्याची मुभा
- दुपारी 3 नंतर अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही
- कृषी संबंधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू