मावळ (जि. पुणे) : मावळमध्ये महायुतीच्या मेळाव्यामध्ये बोलताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गेल्या 2019 मधील निवडणुकीचा दाखला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर दिला. गेल्या लोकसभेत मी निवडून येणार हे ठामपणे सांगितलं होतं अन् मी खासदार झालो, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांसमोरच पार्थ पवारांच्या पराभवावर भाष्य केले. 


श्रीरंग बारणे यावेळी बोलताना म्हणाले की, अजित पवारांनी मला पहिलं तिकीट दिलं होतं. महापालिकेत त्यांच्यामुळे मी नगरसेवक म्हणून गेलो. कालांतराने मी वेगळ्या युतीत गेलो. आम्ही संपर्कात होतोच, आत्ता ही लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा अजितदादांचा फोन सर्वात आधी आला. 


आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे.


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशातील आजवर झालेल्या पंतप्रधानाच्या काळात घटना दुरुस्ती किती वेळा झाली. मात्र, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहे त्याला काही अर्थ नाही.


संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवरूनही अजित पवार यांनी भाष्य केले. विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका.


140 कोटींमध्ये 70 कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात 1 लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलत आहेत. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे, विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असल्याचे अजित पवार म्हणाले. 


महायुतीच्या बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार 


दुसरीकडे, मावळ लोकसभेची उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थित सुरू असलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीवर रामदास आठवलेंच्या आरपीआय गटाने बहिष्कार टाकला. मंचावर स्थान न दिल्यानं बैठकीतून आरपीआय गट बाहेर पडला. सभागृहाबाहेर घोषणाबाजी सुरू झाली, तेव्हाच उदय सामंत त्यांचं भाषण संपवून पुढच्या दौऱ्याला निघाले होते. 


आरपीआय गटाने सामंतांना घेराव घातला, आमचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांना डावलण्यात आलं असेल तर आम्ही का थांबावं. असा सवाल सामंतांना विचारला असता, नजर चुकीनं घडलं असेल, अशी कबुली सामंतांनी दिली. सामंतांनी आरपीआय गटाची समजूत काढून उमेदवार श्रीरंग बारणेंशी चर्चा घडवून आणली, त्यानंतर कांबळे यांना मंचावर स्थान दिलं.  


इतर महत्वाच्या बातम्या