Pune: पुण्यात केशरची शेती फुललीय. ती देखील वारजेसारख्या या गजबजलेल्या भागात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य? हो हे शक्य आहे आणि या शेतीला ना पाण्याची गरज आहे, न मातीची गरज आहे, न सूर्यप्रकाशाची. कारण ही शेती होतेय ती फिरत्या चाकांवर असलेल्या या कंटेनरमध्ये. मागील सहा वर्ष कंटेनरमध्ये वेगवेगळी पिकं पिकवल्यानंतर शैलेश मोडक नावाच्या तरुणाने ही केशराची शेती यशस्वी करून दाखवलीय. 

Continues below advertisement

दहा वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यावर शैलेश मोडक यांनी जेव्हा लाखो रुपयांची नोकरी सोडून जेव्हा शेती करायच ठरवलं, तेव्हा साऱ्यांनीच त्यांना वेडात काढलं. पण या वेडातूनच ही न्यारी दुनिया फुलली आहे. एरवी फक्त इराण- तुर्कस्तान आणि काही प्रमाणात आपल्या काश्मीरमध्ये पिकणारं केशर त्यांनी इथ पिकवलं आहे. केशरचा कंद उगवून येण्यासाठी एरवी मातीत बी पेरावं लागतं. पण इथे फक्त हवेतील आर्द्रता नियंत्रित करून हे कंद वाढवण्यात आलेत. या कंदांना जेवढं तापमान लागतं ते इथ सेन्सरच्या साहाय्याने नियंत्रित करण्यात आलं आहे. केशरच्या पिकासाठी लागणारा हवेतील प्रत्येक घटक इथ पुरवण्यात आला आहे. 

केशरच्या या कंटेनरमध्ये एक सेन्सर आहे. तसेच सूर्यप्रकाशाची गरज भरून काढण्यासाठी रंगबीरंगीत लाईट्स आहेत. यात कार्बनडायऑक्साईड पुरवणारे सिलेंडर देखील आहेत. हे सगळं कंट्रोल होत ते मोबाईलच्या एका क्लिकवर. केशराच्या या शेतीसाठी शैलेश मोडक यांनी काश्मीरमधील पाम्पोर इथं जाऊन तिथल्या शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आणि तिथून केशरचे कंद ते पुण्याला घेऊन आले.  पाम्पोरमध्ये जसं हवामान आहे, तसं हवामान त्यांनी या कंटेनेरमधे निर्माण केलं आहे. त्यासाठी ते दररोज पाम्पोर मधील हवामानात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवतात आणि त्यानुसार इथ तापमान आणि इतर गोष्टी नियंत्रित करतात. 

Continues below advertisement

2018 साली शैलेश यांनी मुंबईतील जे एन पी टी बंदरातून पाच लाख रुपयांना हा कंटेनर विकत घेतला आणि त्यामध्ये कंट्रोल फार्मिंग करायच ठरवलं. एरवी एक एकर शेतीमध्ये जेवढं पीक उगवलं असतं, ते या कंटेनरच्या आतमधील 320 स्क्वेअर फूट जागेमध्ये घेण्यात आला आहे. केशरच्या आधी या कंटेनरमधे शैलेश मोडक यांनी इतरही पिकं यशस्वीपणे घेऊन दाखवली आहे.

शैलेश यांनी या कंटेनरमध्ये पिकवलेलंहे पाचवं पिक आहे. याआधी त्यांनी यात अंजीर, स्ट्रॉबेरी, विदेशी पालेभाज्या पिकवल्या आहेत. एरवी काही एकर जागा लागली असती या पिकांसाठी, ती या कंटेनरमध्ये बारच्या साहाय्याने निर्माण करण्यात आली आहे. यातील बार हे लाईट्सच्या दिशेने विशिष्ट पद्धतीने उभे करण्यात आलेत. हा कंटेनर ट्रकवर लादून कुठेही नेहता येतो आणि कुठेही पार्क करता येतो. कंटेनरमधील या शेतीचा नैसर्गिक हवामानाशी कोणताही संबंध नसल्याने वर्षाचे बाराही महिने या कंटेनरमधे हवं ते पीक काढता येतं. दरम्यान, पिढ्यानपिढ्या तोट्यात चालणाऱ्या शेतीला शैलेश मोडक यांनी स्टार्टअपचं रुप दिलं आहे.  मागील सहा वर्षांमधे हे स्टार्टअप यशस्वी ठरत आहे.