पुणे : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ आज कन्नड संघटनांकडून महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली. या दगफेकीचे पडसाद आता पुण्यात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट भागात खासगी पार्किंगमधे उभ्या असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेसना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले होते. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत यावेळी बसेसना काळा आणि भगवा रंग लावण्यात आला. बसेसवर कन्नड भाषेत लिहण्यात आलेला मजकूर काळ्या आणि भगव्या रंगाने पुसून टाकण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सीमा भागातील वातावरण चांगलच तापलं आहे. त्यातच महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळागावात येऊ नये असा इशाला बोम्मई यांनी दिला. तर बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ आज महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेताल. पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसेसना काळा आणि भगवा रंग लावला. यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्त्यांनी पार्किंगमध्ये उभा असलेल्या सर्व बसेसना काळा आणि भगवा रंग लावला. 


यावेळी पोलिस दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. "कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. परंतु, पोलिस आमच्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. खासगी पार्किंगमध्ये उभा करण्यात आलेल्या बसेस बाहेर काढण्यात याव्यात अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. परंतु, पोलिसांनी यावेळी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  


दरम्यान, याच वादावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कर्नाटक सरकारला इशाला दिलाय. "सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासात थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. 


महत्वाच्या बातम्या


सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासांत थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घेऊ; शरद पवारांचा इशारा