बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल (सोमवारी)बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात मोठं शक्तिप्रदर्शन देखील केलं. कन्हेरी या ठिकाणी त्यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेबाबत भाष्य करत सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं चुकलं पण आता, शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी देऊन तात्याराव पवारांचं कुटुंब फोडलं नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर आता त्याबाबत पवार कुटूंबातील व्यक्तींनी भाष्य केलं आहे, तर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार देखील याबाबत एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणालेत श्रीनिवास पवार?
भावनिक, भावनिक म्हणत अजित दादा का भावनिक झाले. आईला यामध्ये घ्यायलं नको होतं, आणि आईला मध्ये घेऊ नये. तिचा राजकारणाशी संबधं आहे. उगातच घरातील लोकांना घेऊन, शेवटी म्हणायचं आमचं कुटूंब आहे, कुटूंबातील गोष्टी चार चौकटीत राहिल्या पाहिजे म्हणायचं पण, आपणं सगळं बोलून जायचं हे चुकीचं आहे. तात्यासाहेबांचं घर फोडलं या वक्तव्यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, हा फार चुकीचा आणि दुर्दैवी आरोप आहे. मला दु:ख झालं ते वक्तव्य ऐकून, माझे वडील गेले तेव्हा मी १४ ते १५ वर्षांचा होतो. दादा १८ वर्षांचा होता. शरद पवारांना आम्ही तात्यासाहेबांच्या जागी पाहिलं. आताही बघतो, आणि बघत राहू. त्या शरद पवारांवर दादांनी गंभीर आरोप केला. यासारखं दुर्दैव नाही.
जशी साहेबांनी ३० वर्ष बारामती सांभाळली, नंतर अजित पवारांना बारामती 30 वर्षे संभाळली, आता नवीन पिढीला संधी द्यावी. जसं दादा म्हणाले युगेंद्र पवारांनी माघार घ्यावी, तसं मी म्हणणार नाही. प्रत्येकाने आपापला विचार करावा, एकीकडे विकासाच्या मुद्द्यावरती बोलायचं आणि दुसरीकडे भावनिक करायचं हे का करावं लागतं? तसेच कुटूंबाला मध्ये का आणलं जातं असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
काय म्हणालेत अजित पवार?
‘मी सुप्रियाच्या विरोधात लोकसभेला सुनेत्राला उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. पण आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो, आईने आधार दिला, आईने सांगितले होते, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कोणी भरायला सांगितला असे विचारले तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला. म्हणजे साहेबांनी तात्यासाहेबांचे कुटुंब फोडले, असे म्हणायचे का? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.