पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. विलास लांडे यांच्या भूमिकेने भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी या मतदार संघामधून निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपने लढवला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार महेश लांडगेंना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या मतदार संघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी दावा ठोकला होता. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. 


विलास लांडेंनी भूमिका केली जाहीर


तर अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे देखील भोसरीतून निवडणुकीसाठी इच्छुक होते. विलास लांडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. महायुतीत राहून ते मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करण्याची भूमिका विलास लांडेंनी जाहीर केली आहे.  


महेश लांडगेंची कोंडी


त्यामुळं भाजपचे उमेदवार महेश लांडगेंची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. भोसरी बकाल झाली, भोसरी दहशतीखाली वावरते, असं म्हणत महायुतीत राहून लांडेंनी महायुतीचे उमेदवार लांडगेंना लक्ष केलं आहे. तर विलास लांडे माझ्यासोबत होते, आहेत, अन् पुढंही राहतील. हे मी सुरुवातीपासून सांगत आलोय. आज याची प्रचिती सर्वांना येतेय, असं म्हणत शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणेंनीही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


आणखी वाचा


कुस्तीच्या मैदानात उतरण्याआधी वस्तादाचे पैलवानांना दोन सल्ले, युगेंद्र पवारांबद्दल बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले?