बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर सभेवेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. ‘मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. पण आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो, आईने आधार दिला, आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात. हे जे काय चाललं आहे ते बरोबर नाही, मग त्याच्यामध्ये मोठ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होतं, फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असा सवाल करताच अजित पवार यांना सभेच्या स्टेजवर अश्रू अनावर झाले यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं आहे.
एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, मी प्रचारात होते, त्यामुळे दादांचं सर्व भाषण ऐकता आलं नाही, पण त्यांच्या भाषणातील काही मुद्दे पाहिले, वाचले. मी त्यांच्यापेक्षा वयाने खुप लहान आहे. आपल्यापेक्षा मोठे किंवा वरिष्ठ असतात, त्यांच्यावर बोलायचं नसतं. त्यामुळं मी त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
साहेबांनी आमचं घर फोडलं का? यावर काय म्हणाले युगेंद्र पवार?
अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना, मला तसं वाटत नाही. पवार कुटूंबात वेगवेगळ्या विचारांची लोक होते. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये अॅक्टीव्ह होते, तरीदेखील आमचं कुटूंब एकत्र होतं. त्याचप्रमाणे यापुढे देखील आपले विचार वेगळे असतील तरी कुटूंब एकत्र असेल. आमच्या कुटूंबाला कधी भाजपची विचार पटले नाहीत. आम्ही जिथं काल होतो, त्याच विचारांचे आज आहोत, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
आजीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
लहानपणापासून माझी आजी मला आशिर्वाद देत आली आहे. माझं आणि आजीचं एक वेगळं असं भावनिक नातं आहे. एका नातवाचं आणि आजीचं एक वेगळं नातं असतं. कधीच मी आजीला राजकारणात आणलं नाही, मी त्यांचा फोटो कधी पोस्ट केला नाही, आणि आजीला मला कधी राजकारणात आणायचं नाही. तो विषय कुठेतरी थांबलं पाहिजे, असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
काल शरद पवार माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले, ५७ वर्षांनंतर शरद पवार कोणाचातरी फॉर्म भरायला आले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, मी हे कधी विसरणार नाही असंही ते यावेळी म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
काल (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बारामती मतदारसंघात अजित पवारांची सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी बारामतीकरांना साद घातली, तर भरसभेत अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. ‘मी सुप्रियाच्या विरोधात लोकसभेला सुनेत्राला उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. पण आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो, आईने आधार दिला, आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात. हे जे काय चाललं आहे ते बरोबर नाही, मग त्याच्यामध्ये मोठ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होतं, फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असा सवाल अजित पवार यांनी केला, त्याचवेळी सभेच्या स्टेजवर पवारांना अश्रू अनावर झाले.