Pune: पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavahane) आणि समर्थकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उमटल्याचं चित्र दिसून येत आहे. अजित गव्हाणे आणि समर्थकांच्या पक्षप्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेतली. त्यामध्ये अजित गव्हाणेंना तिकीट दिलं, तर आपण तुतारीचा प्रचार करायचा का नाही? याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. 


उद्धव ठाकरेंनी ग्रीन सिग्नल देताच पदाधिकारी अॅक्शन मोडमध्ये


अजित गव्हाणे (Ajit Gavahane)आणि समर्थकांच्या पक्षप्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी ग्रीन सिग्नल देताच भोसरी विधानसभेतील शिवसैनिक आज जेजुरीकडे मार्गस्थ झालेत. आज ते सर्वजण खंडोबारायाची तळी उचलणार आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यात भोसरी विधानसभेतून शिवसेनेचा आमदार मशाल पेटवणार, असा प्रण आज हे शिवसैनिक करणार आहेत. 


पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी (Ajit Gavahane) शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून आल्यावर त्यांच्यात मोठा उत्साह निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे. 


अजित गव्हाणेंच्या पक्षप्रवेशानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये काय झाली चर्चा? 



आज काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)मध्ये पक्षप्रवेश केला. ज्यांनी भोसरीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलं त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे आमच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे निष्ठा आणि गद्दारी यांच्याभोवती फिरते आहे. सामान्यांना न पटणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. उद्या आम्ही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही अमोल कोल्हे यांचं काम केलं होतं. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे, निष्ठावंताला ही जागा मिळाली अशी आमची मागणी आहे असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 



पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश



पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला. अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे. मंगळवारी या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का मानला जात आहे.