पुणे : पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बराटे आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्यांच्या घरावर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना शेकडो फाईल्स सापडल्या आहेत. या फाईल्स राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय कुलमुखत्यार पत्रे, खरेदीपत्र, करारनामे, भागीदारी पत्रे आणि इतर दस्तऐवजाचा समावेश आहे. रविंद्र बराटे सध्या फरार असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी रवींद्र बराटेसह त्याच्या नातेवाईकांच्या घरावर एकाच वेळी धाड टाकली. कोंढव्यातील लुल्लानगरमधील मधूसुधा अपार्टमेंट, धनकवडीतील सरगम सोसायटीत असणारा रायरी बंगला, रवींद्रर बराटेची मुलगी चालवत असलेले फार्मासिटिकल शॉप, बराटेच्या मुलीच्या सासर्‍याचे धनकवडी येथील घर, बराटेच्या बहिणीचे मुकुंदनगर येथील घर, बराटेच्या मेहुण्याचे एरंडवणा येथील घर, बिबेवाडी मार्केट यार्ड येथील घर या सर्व ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. परंतु रविंद्र बराटे या ठिकाणी सापडला नाही.


सरगम सोसायटीतील रायरी बंगल्याच्या झडतीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली. यामध्ये माहिती अधिकारात केलेले अर्ज, माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती, पुणे आणि मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक अशी संबंधित असलेली कागदपत्रे, शासकीय ठेकेदाराची संबंधित असलेली कागदपत्रे, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, इन्कम टॅक्स कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, वेगवेगळ्या राजकीय व्यक्तीशी संबंधित असलेले कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.