Shivajirao Adhalarao Patil : गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे. कोणीही सांगावं मी कोणती पक्ष विरोधी कारवाई केली. माझी झालेली हकालपट्टी ऐकून मी खूप दुःखी झालो असल्याचे वक्तव्य शिवसेने उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं. आता हकालपट्टी केली नाही, असं पत्र पाठवलं आहे. पण काय फायदा झाला त्याचा. यातून माझी राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? 20 वर्ष निष्टेनं काम केली त्याचं हे फळ मिळालं. पक्षात आज माझी काय किंमत आहे हे मला समजलं असेही आढळराव पाटील म्हणाले.  



नेमकं काय चाललंय हे कळेना


राष्ट्रवादी काँग्रेसला मी अंगावर घेतलं हिच माझी चुक दिसतेय. त्याची ही शिक्षा असेल तर मला मान्य आहे. पण तरीही मी आजही पक्षाविरोधात नाही. बघू पुढं काय होतंय असं सूचक वक्तव्य देखील आढळराव पाटील यांनी केलं. नेमकं काय चाललंय हे कळेना. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलंय. त्यात अनेकांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मग माझ्या एकट्यावर हकालपट्टीची कारवाई का? असा सवालही आढळराव पाटील यांनी केला. आज सकाळपासून मला अनेकांचे फोन आले. सामना पेपर आणि न्यूज चॅनेलवरील बातम्या पाहिल्या त्या खऱ्या आहेत का? मला आधी वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करतंय. मात्र मी स्वतः सामना पेपर वाचला आणि मला धक्का बसला असेही शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची हेच समजत नव्हतं असं त्यांनी सांगितले. 


उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली हळहळ 
 
उद्धव ठाकरे यांनीही मला सकाळी फोन केला होता. जे घडलं ते पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली. पण या कारवाईतून माझी राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? आज दिवसभर मी विचार करेन. हवं तर उद्धव ठाकरेंना देखील भेटेन. मग पुढचा निर्णय ठरवूयात असेही आढळराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे आज राष्ट्रवादी विरोधात बोलतायेत. मी गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना अंगावर घेतोय. आता फक्त आम्हाला गोळी मारायची बाकी होती. एकनाथ शिंदेंना समर्थन करण्याचा आणि न करण्याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून मला कोणत्याही पक्षाचा फोन आला नाही. शिवसेनेत आल्यापासून मी भाजपमध्ये जाणार, राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे. पण त्यात आत्तापर्यंत तथ्य नव्हतं, यापुढेही नसेल असे त्यांनी सांगितले.


शरद पवारांनी दिलेली ऑफर नाकारली


शरद पवारांनी मला ऑफर दिली होती. ते शिरुर मधून निवडणूक लढणार होते. मला ते दोन वेळा राज्यसभेवर पाठवणार होते. तरी ती ऑफर मी नाकारली. गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे असेही आढळराव पाटील म्हणाले.