पुणे : पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी ही मेट्रो (Pune Metro)  मार्गिका लवकर सुरु करा, या मागणीसाठी पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांनी थेट पुण्यातील पुणे मेट्रो कार्यालयाला घेराव घातला आहे आणि विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या आहे. त्यासोबतच लवकर या मार्गिका सुरु करा नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने दिला आहे. 


मागील काही दिवसांपासून पुणे मेट्रो वेगवेगळ्या कारणावरुन चर्चेत आहे. पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचं काम पूर्ण होऊन त्याची ट्रायलदेखील पार पडली आहे. मात्र तरीही ही मार्गिका मेट्रो प्रशासनाकडून सुरु करण्यात येत नाही आहे. त्यात मध्यंतरी पुणे मेट्रोच्या या मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. मात्र त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर लवकर ही मार्गिका सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सगळं काम तयार असूनही या मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाला विलंब केला जात आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आक्रमक झाला आहे आणि त्यांनी थेट मेट्रो कार्यलयाला घेराव घातला आहे. 
 
मेट्रोची ट्रायल झाल्यावर काही बदल करायला सांगितले आहेत. त्यावर मेट्रो प्रशासनाकडून काम सुरु आहे. हे काम झालं की लवकरच उद्घाटन करु, असं मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र येत्या 10 दिवसांत मेट्रो सुरु नाही केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून देण्यात आला आहे. 


पुणे मेट्रोच्या बुधवार पेठेच्या स्थानकाचा नवा वाद


आज सकाळी पुणे मेट्रो विरोधात ठाकरेंची शिवसेना  आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावाचा नवा वाद समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्याठिकाणी कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला आहे. शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. या नावावरुन यापूर्वीही वादावादी झाली होती. मात्र यंदा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी थेट मेट्रो स्थानकावर जाऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट बुधवार पेठ लिहिलेला बोर्ड काढून कसबा लिहिलेला बोर्ड लावला आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीदेखील केली. शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे आणि शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं. हा सगळा प्रकार पाहून पोलिसांनीदेखील या आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली होती. मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता हे कार्यकर्ते स्थानकात शिरले आणि त्यांनी थेट बोर्ड काढून टाकला.


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News :  40 हजारात एक लाखांच्या बनावट नोटा; 500च्या दोन नोटा अन् बाकी वह्यांचं बंडल; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड