Pune News : पुणे (Pune) शहरातील कोथरूडमध्ये सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरु आहे. या ठिकाणी कोथरुडकडे उतरणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि उड्डाणपुलाचे सुरु असलेले काम तसेच मुंबईहून येणारी वाहतूक यामुळे महामार्गावर चांदणी चौकात वाहतूककोंडी होत आहे. त्यातच अधिक भर म्हणजे, रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या बॅरिगेट्समुळेही वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही परिस्थिती लवकर दूर व्हावी याकरता चांदणीचौक ट्रॅफिक मुक्तीसाठी बावधन गावचे सरपंच, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल दुधाळे यांच्या वतीने बॅरिगेट उखडून टाकण्याचे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनापूर्वीही चांदणी चौकातील वाहतुकीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा संबंधित खात्याशी निगडित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र, अजूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्यामुळे बावधन शिवसेनेच्या वतीने सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल दुधाळे यांच्याबरोबर शिवसेना जिल्हासंपर्क संघटिका स्वाती ढमाले, कृषीउत्पन्न बाजार समितीचे अमोल मोकाशी, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप बांदल, शाखा प्रमुख दत्तात्रय दगडे, तुषार दगडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
चांदणी चौकातून कोथरूडला जाणारा रस्ता एका आठवड्यात चालू करू असे आश्वासन संबंधित एनसीसी लिमिटेड या कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या वतीने आंदोलनाच्या दरम्यान देण्यात आले. तरी, या आठवडाभरात रस्ता सुरु झाला नाही तर जन आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख राहुल दुधाळे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
Pune News : पैज लावणं जीवावर बेतलं, पुण्यातील इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
Pune: पुण्यातील पासलकर कुटुंबाकडे भरते पोपटांची मैफल, जाणून घ्या काय आहे बातमी
रघुनाथ कुचिक प्रकरणात माझ्यावर केलेले सगळे आरोप धादांत खोटे, चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण