पुणे : शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत:च ट्विट करीत याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन यावेळी खासदार कोल्हे यांनी केलं आहे.


डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट काय आहे?
कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. 



डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे. दरम्यान, डॉ. कोल्हेंना किमान 14 दिवस आता विलगीकरणात राहावे लागणार आहे. 






बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या प्रयत्नांना तूर्तास ब्रेक 
राज्यात बैलगाडी शर्यती सुरू करण्याचा मुद्दा पुन्हा तापू लागलाय. शर्यती सुरू करण्यासाठी राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना आग्रह धरतायत. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती वर्षानुवर्षे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरल्यात. या भागातले लोकप्रतिनिधी त्यासाठी अधिक आग्रही आहेत. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही उपस्थित केला होता. गेल्या काही दिवासांपासून पुन्हा कोल्हे यांनी या संदर्भात बैठका घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, आता कोविड संसर्ग झाल्याने बंद पडलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना तूर्तास ब्रेक लागला आहे. 


या आठवड्यातच ते यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार होते. केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री परषोत्तम रुपाला यांनाही ते भेटणार होते. ओझर (ता.जुन्नर,जि.पुणे) येथे नुकतीच त्यांनी बैलगाडा शर्यतीचे शौकीन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन ही शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.