Shirish More : देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे (Shirish More) यांनी राहत्या घरी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच ही घटना घडली आहे. शिरीष महाराज (Shirish More)  यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चार चिठ्ठ्या एबीपी माझाच्या हाती आल्या आहेत. 


शिरीष महाराज मोरेंनी (Shirish More) अचानक टोकाचे पाऊल का उचलले? याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दडलं आहे. पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येमागचं कारण ही समोर आलं आहे. माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, पैकी कार विकून 7 लाख फिटतील. 


वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या,अशी विनंती शिरीष महाराज मोरेंनी मित्रांना केली आहे. मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली आहे. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग. असं ही चिठ्ठीत नमूद केलेलं आहे.
शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.


शिरीष महाराजांचा थोडक्यात परिचय


शिरीष मोरे महाराज यांचे देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठे योगदान होते. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असत. त्याचबरोबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे देहूतील आरएसएस कार्यकर्त्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा पंचक्रोशीत मोठा नाव लौकीक होता. नुकतंच त्यांचं लग्न देखील ठरलं होतं.