Nilesh Majhire : मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे (Nilesh Majhire) यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही आहे. मात्र पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. 


बुधवारी (1 फेब्रुवारी) राहत्या घरात पत्नीने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी (2 फेब्रुवारी) दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलेश माझिरे यांना काही दिवसांपूर्वीच मनसेतून शिंदे गटात प्रवेश घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली होती. 


कोण आहेत निलेश माझीरे?


मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्षपद असलेले निलेश माझिरे यांची काही दिवसांपूर्वी पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांच्यासह 400 पदाधिकारी आणि सदस्यांनी मनसेला रामराम ठोकला आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अर्थात शिंदे गटात होता. त्यानंतर मनसेत मोठं खिंडार पडल्याचं बोललं गेलं होतं. 400 पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेचा राजीनामा दिला आहे, असा दावा त्यांनी केला होता. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते.