Kunal Tilak : पुण्यातील कसबा मतदार  (kasba bypoll election)संघाच्या पोटनिवडणूकीसाठी मुक्ता टिळकांचे पती यांनी उमेदवारी अर्ज घेतला. त्यानंतर कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट आला आहे. मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळक (kunal tilak) यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कसबा मतदार संघात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.


 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात कुणाल टिळक यांंच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच संदीप खर्डेकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. गेल्या महिन्यात प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यात आणखी भर घालून नव्या नावांसह यादी आज पुन्हा प्रसिद्ध केली आहे.


आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर टिळक कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी केली होती. त्यांच्यासोबतच मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळक याचं देखील नाव चर्चेत होतं. दोघांकडून पोटनिवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली होती. त्यात आता शैलेश टिळकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपकडून किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून अजूनही उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही आहे. मात्र टिळकांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतल्याने भाजपचा उमेदवार ठरल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.


भाजपकडून इच्छूक उमेदवार 
पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवर अनेकांचा डोळा आहे. त्यात भाजपचं अनेक वर्ष काम करत असलेल्या उमेदवारांचादेखील समावेश आहे. धिरज घाटे, गणेश बिडकर, हेमंत रासने हे या उमेदवारीसाठी इच्छूक आहे. मात्र यांच्यापैकी कोणीहीअजून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली नाही आहे. 


दोन दिवसांत भाजपचा उमेदवार निश्चित होणार?
अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपचे कसबा आणि चिंचवडचे उमेदवार पक्षाला जाहीर करावे लागणार आहे. भाजपच्या अनेकांनी पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. उमेदवारीसाठी भाजपच्या बैठकींचं सत्र सुरु आहे. कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदार संघात भाजपने बैठकी घेतल्या आहेत. शिवाय उद्या (3 फेब्रुवारी) शिंदे गट आणि भाजपची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पदाधिकारी उपस्थित असणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात कसबा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी नेमका कोण दावेदार ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.