पुण्यात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची एकमेकांवर स्तुतीसुमने!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 13 Nov 2016 07:33 PM (IST)
पुणे : एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवार यांनी आज त्यांची तोंडभरुन स्तुती केली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांच्या कामाचं कौतुक केलं. जपान दौऱ्याहून भारतात परतल्यानंतर मोदींनी सकाळी बेळगाव, दुपारी गोवा तर संध्याकाळी पुण्यातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या उर्जेची आणि उत्साहाची तोंडभरुन स्तुती केली. तर त्याच व्यासपीठावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांचे कौतुक केले. मोदी म्हणाले, “शरद पवार यांची शेतकऱ्यांबद्दल जबरदस्त बांधिलकी आहे.” पुण्यात मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट येथे शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घटनासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठार आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांसह अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते. वेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदींनी ऊस संशोधन केंद्रात फेरफटका मारला.