Sharad Pawar at Junnar : पुणे : इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात जुन्नरमधील (Junnar) शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना मिळालेला नफा, या मुद्द्यांवरही भाष्य केलं. तसेच, पंतप्रधान मोदींनी (PM Modi) नाशिक दौऱ्यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाहीतर अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं (Ram Mandir Inauguration) आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. 


पुण्यातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. तत्पूर्वी विघ्नहर साखर कारखान्यात आसवनी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचं लोकार्पणही शरद पवारांच्या हस्ते झालं. 


पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही : शरद पवार 


पंतप्रधान मोदी काल नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली होती. यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. "ते म्हणाले की, घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.", असं शरद पवार म्हणाले. 


मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण... : शरद पवार 


"अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाणार, श्रीराम हे सर्वांचे आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. 


अयोध्येच्या विमानांच्या तिकिटात वाढ : शरद पवार 


"अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाहीतर, त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहील. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचं काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील.", असंही शरद पवार म्हणाले आहेत. 


...म्हणून ब्राझीलचे साखर कारखानदार भारतापेक्षा वरचढ : शरद पवार 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल, वीज आणि सोबतच इतर निर्मिती व्हायला हवी. याबाबत आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्फरन्स सुरू आहे. साखर एके साखर हे करून चालणार नाही. मशिनरीमध्ये सुधारणा करून साखर उत्पादनात खर्च कमी करायचा आणि उरलेला पैसा शेतकऱ्यांना कसा मिळेल? हे त्यामागचं सूत्र आहे." 


"ब्राझीलमध्ये साखर निर्मितीचं धोरण वेगळं आहे. त्यांच्याकडे साखरेचे भाव वाढले की, ते इथेनॉलची निर्मिती वाढवतात. इथेनॉलची किंमत वाढली की, साखरेचं उत्पादन वाढवतात. जागतिक बाजाराचा अभ्यास करून हे त्यांचं धोरण ठरवतात आणि त्यांचं सरकारही त्यांच्या पाठीशी उभं असतं, हा जमीन अस्मानचा फरक आहे. ब्राझील सीएनजीची ही निर्मिती करतं, त्यामुळं त्यांना पेट्रोलची गरज कमी भासते.", असं शरद पवार म्हणाले. 


शरद पवारांनी जुन्नरमधल्या कार्यक्रमात बोलताना भाजप सरकारच्या कांदा निर्यात धोरणावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, "रोजच्या जेवणात कांद्याचा खर्च हा पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मग त्याचं उत्पादन करणाऱ्यांना शेतकऱ्यांना थोडा भाव मिळाला तर काय फरक पडतो. म्हणून मी कधीच कांदा निर्यात बंदी धोरण आणलं नाही."


"नितीन गडकरी केंद्रातील मंत्री आहेत. त्यांना देशात किती साखर शिल्लक आहे, हे आम्ही त्यांना दाखवून दिलं. त्यामुळं साखर निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं. गडकरी शेतकऱ्यांच्या कामात मदत करतात, समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे. हे ते पाहत नाही, मदत करण्याची त्यांची इच्छाशक्ती असते. त्यामुळे ते हा निर्णय घेऊ शकणार नसले, तरी ते केंद्रात जाऊन हा मुद्दा नक्कीच मांडतील.", असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, चार वर्षांपूर्वी पंजाब, राजस्थानसह काही राज्यातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीचा प्रवेशद्वार रोखला होता. सरकारच्या शेती धोरणाविरोधात आवाज उठवला, मग सरकारला नमावं लागलं. आपण सगळे एक आहोत, आपकी एकजूट असायला हवी, असा नारा पवारांनी दिला आहे.