बारामती (पुणे): एखाद्या वक्त्याने मंचावरील उपस्थित मान्यवरांची स्तुती करणं हे तसं सामान्य आहे. पण स्तुती नको, भाषण आवरा असं म्हणण्याची वेळ खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आली. ज्येष्ठ नागरिकांची पल्लेदार आणि विसंगत भाषणं ऐकून शरद पवारांनी डोक्याला हात लावून, भाषण आवरण्याच्या सूचना केल्या.

बारामतीत वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयवदान आणि इतर उपकरणांचं वितरण करण्यात आलं. मात्र यावेळी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी योजनेविषयी न बोलता थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंचावर उपस्थित असणाऱ्या शरद पवारांनी डोक्याला हात लावला.  आणि लाभार्थींचं मनोगत थांबवण्याच्या सूचना केल्या.



हा सर्व प्रकार घडला तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्षपाल गुर्जर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदार संघातील साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना  वयोश्री योजनेंतर्गत कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये एकूण 3270 लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला.



यावेळी लाभार्थी वृद्धांना मिळालेल्या वयोश्री योजनेबाबत मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं. काही ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत मांडण्यात सुरुवात केली. पण त्यांनी या योजनेच्या लाभाऐवजी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस विषयी गोडवे गाऊ लागले.

यात त्यांनी "साहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे", "साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावेत", "साहेब तुम्हाला 101 वर्षाचे आयुष्य लाभो", " साहेबांनी कोंबड्यापासून जनावरांपर्यंत सगळे काही दिले" असे म्हणत या केंद्र सरकारच्या कार्यक्रमात आणि खुद्द शरद पवार यांच्यासमोर पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त केल्यामुळे, शरद पवारांनी त्या नागरिकांस तात्काळ थांबण्याची विनंती केली.

दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकानेही उठून पहिल्याचीच री ओढली. यावेळेस पवारांनी मात्र डोक्याला हात लावून पुन्हा त्या व्यक्तीला थांबवण्याच्या सूचना केल्या. या योजनेच्या लाभाऐवजी हे नागरिक पक्षाचेच गुणगान गात असल्याने, हा प्रकार होत असताना सभागृहामध्ये एकच हशा पिकला.