पुणे: शनिवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात उपस्थित असता अस्वस्थ वाटणाऱ्या शरद पवारांची (Sharad Pawar) तब्येत आता स्थिर आहे. डॉक्टरांनी पवारांची तब्येत तपासली असता ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर शरद पवारांनी नागरिकांना भेटायला सुरुवात केली आहे. दिवाळीनिमित्ताने पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातील नागरिकांनी त्यांच्या बारामतीतील घरासमोर एकच गर्दी केली आहे. 


शरद पवार दिवाळीनिमित्त बारामतीत आले आहेत. मागील दोन दिवसांपासून पवार बारामतीत आहेत. शनिवारी विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान त्यांना अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. त्यानंतर त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले असता सुळे यांनी तात्काळ येथील हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांच्यामार्फत तपासणी केली. सततचे कार्यक्रम आणि प्रवासामुळे त्यांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तब्येत स्थिर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार पुन्हा नागरिकांना भेटत आहेत. 


बारामतीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात शरद पवारांना अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्यानंतर स्टेजवरच त्यांची तपासणी करण्यात आली होती. सततच्या दगदगीमुळे पवारांना अस्वस्थ वाटत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांना आराम करण्याचाही सल्ला दिला. 


अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच स्टेजवर


तब्येतीच्या कारणास्तव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात जरी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) येऊ शकले नाहीत. तरीही त्यांनी शारदोत्सवाच्या कार्यक्रमात मात्र उपस्थिती लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं. 


दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shaha) भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट बारामती गाठली. त्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर आले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात दिवाळीच्या निमित्ताने शारदोत्सवाच्या कार्यक्रमात ते एकत्र आले. 


दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतील गदिमा सभागृहात शारदोत्सवाच्या आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी गायिका बेला शेंडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच दरम्यान सत्कार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले. या शारदोत्सवाला शरद पवार देखील हजरी लावणार होते, परंतु तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.


ही बातमी वाचा: