पुणे: तब्येतीच्या कारणास्तव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात जरी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) येऊ शकले नाहीत. तरीही त्यांनी शारदोत्सवाच्या कार्यक्रमात मात्र उपस्थिती लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shaha) भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट बारामती गाठली. त्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर आले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात दिवाळीच्या निमित्ताने शारदोत्सवाच्या कार्यक्रमात ते एकत्र आले.
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतील गदिमा सभागृहात शारदोत्सवाच्या आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी गायिका बेला शेंडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच दरम्यान सत्कार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले. या शारदोत्सवाला शरद पवार देखील हजरी लावणार होते, परंतु तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
शरद पवार-अजित पवार यांची भेट
शनिवारी पवार कुटुंबीयांच्या कौटुंबिक कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी ही भेट झाली. यावेळी पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. दिवाळी आणि प्रतापराव पवार यांचा वाढदिवस या यानिमित्त ही भेट झाल्याचं शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी सांगितलं.
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर अजित पवारांनी लागोलाग दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
अजित पवार हे 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित पार पडलेल्या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते. त्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात नव्हते. 29 ऑक्टोबरला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 15 दिवसांनंतर अजित पवार यांनी आधी शरद पवार यांची भेट घेतली आणि नंतर अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी हालचाल होत असल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा: