Sharad Parar on Ajit Pawar Faction : बीडमध्ये अजित पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार गटाला सूचक इशारा दिला आहे. अजित पवार गटाकडून इनकमिंग आणखी वाढेल, असा दावा शरद पवार यांनी केला. त्यामुळे आणखी काही नेते शरद पवार गटात जाण्याच्या मार्गावर आहेत का? याची चर्चा रंगली आहे. 


उमेदवार घोषित झाल्यानंतर इनकमिंगमध्ये वाढ होईल


शरद पवार यांनी आज (22 मार्च) बोलताना समोरच्या बाजूने उमेदवार घोषित झाल्यानंतर इनकमिंगमध्ये वाढ होईल, असा दावा केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा किंवा माढा लोकसभेला शरद पवारांनी स्वतः उतरावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी आपण कोठूनही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांना महायुतीमध्ये गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे किती जागा लढवतील हे बघावं लागेल असं शरद पवार यांनी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यंत हे सरकार पोहोचले


केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी मोदी सरकारवर घनाघाती प्रहार केला आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत या देशांमध्ये एखादा अपवाद वगळल्यास निवडणुका या मोकळ्या वातावरणामध्ये पार पडल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक किती निष्पक्ष होईल, याबद्दल शंका असल्याचे शरद पवार म्हणाले. तपास संस्थांचा वापर केला जात असून काँग्रेसचं खातं सुद्धा गोठवण्यात आलं आहे. देशातील महत्त्वाच्या पक्षाकडे साधनसामग्री नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वी असा प्रसंग कधीच घडला नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 


विरोधी पक्षांच्या लोकांवर ईडी किंवा इतर संस्था वापर केला जात असल्याचे सांगत त्यांनी केजरीवाल यांना सुद्धा असं काही तरी होईल असं वाटलं असल्याचं ते म्हणाले. त्यांनी धोरण तयार केलं असेल, तर तो त्यांचा अधिकार असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांचं धोरण चुकलं असल्यास लोकांसमोर जावं, कोर्टात जावं पण तसे नाही करता अटक करणं चुकीचं असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यंत हे सरकार पोहोचल्याची टीका पवार यांनी केली. 


आणीबाणीमध्येही झालं नाही ते आता होत आहे 


केजरीवालांना अटक होत असेल, तर केजरीवालांच्या 100 टक्के जागा निवडून येतील, मागच्या वेळी दिल्लीमध्ये दोन जागा आल्या होत्या, आता तेवढ्या देखील येणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. आणीबाणीमध्येही झालं नाही ते आता होत असल्याचेही शरद पवार म्हणाले. लोकशाहीचा गळा दाबण्याचा काम सुरू असून 80 ते 90 लोकांची केजरीवालांना पसंती असल्याचे ते म्हणाले. निवडणूक रोख्यांवरूनही पवारांनी तोफ डागली. निवडणूक रोख्यांमधूनसगळे पैसे त्यांना मिळाले असल्याचे शरद पवार म्हणाले. जमा करायचे ते जमा केले म्हणून भाजप गप्प बसल्याचं शरद पवार म्हणाले. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा भाजपला कारण द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या