पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेनं दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनी काल पत्रकार परिषद घेऊन मोहोळची पाठराखण केली, तसंच तो गोरक्षक असल्याचा दावा केला. शिवाय त्याच्या हत्येचा एनआयए तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर विठ्ठल शेलारला अटक केली, ज्याचे भाजपशी (BJP) संबंध आहेत, यांच्यात कनेक्शन आहे का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
भाजपशी संबंधित शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी भाजपशीच संबंधित विठ्ठल शेलारला अटक करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना जवळ केलं. त्यातूनच विठ्ठल शेलारला हत्या, हत्येचा प्रयत्न , खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेले आणि 2017 साली त्याच्यावर मुळशी,भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आला.
कोण आहे विठ्ठल शेलार?
विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. 2017 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, विठ्ठल शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली. त्यानंतर गिरीश बापट म्हणाले होते की, आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती. आम्ही त्याच्यावर कारवाई करू.
रक्तरंजित संघर्ष भाजपला थांबवता आला नाही
याच कालावधीत शरद मोहोळला गंभीर गुन्ह्यांमधून एकामागोमाग एक जामीन मिळत गेले आणि तो देखील 2017 साली तुरुंगातून बाहेर आला. पुढे शरद मोहोळच्या पत्नीने तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघांचा पक्षाला फायदा होईल असा भाजपचा होरा होता. मात्र दोघांमधील व्यवसायिक वाद आणि त्यातून निर्माण झालेला रक्तरंजित संघर्ष भाजपला थांबवता आला नाही.
हे ही वाचा :
शरद मोहोळ हत्या प्रकरणी गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई