पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल (वय 48) यांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला घेऊन लग्न मोडण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अनिष्ट रूढी आणि अघोरी कलमान्वये पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
2017 मध्ये फिर्यादी महिला आणि गणेश गायकवाड यांचे लग्न झाले होते. लग्नामध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. गणेश गायकवाड यांचे वडील नानासाहेब गायकवाड यांच्या सांगण्यावरून फिर्यादीच्या वडिलांनी तिच्या अंगावर 100 तोळे सोन्याचे दागिने घातले होते. इतकेच नाही तर तिला तिच्या मूळ गाव पुण्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा अशी ठेवण्यात आली होती. गणेश गायकवाड हा औंध परिसरातील प्रतिष्ठित आणि कोट्यवधी रुपयांचा मालक असल्यामुळे त्याच्या लग्नसोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मातब्बर लोकांनी हजेरी लावली होती.
मात्र लग्न झाल्यामुळे गायकवाड कुटुंबियाकडून सुनेचा छळ सुरू झाला. वेगवेगळ्या कारणावरून वारंवार तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जाऊ लागला. गायकवाड कुटुंबियांचा अध्यात्मिक गुरु असलेल्या रघुनाथ येमुल याने ही मुलगी पांढऱ्या पायाची आहे, तिच्यामुळेच गणेश आमदार, मंत्री होऊ शकत नाही .त्यामुळे तिला सोडचिठ्ठी द्यावी असे सांगितले होते. याशिवाय रात्री-अपरात्री संबंधित महिलेच्या घराबाहेर अघोरी प्रकार देखील करण्यात येत होते. इतकेच नाही तर गणेश गायकवाड यांनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे देखील म्हटले आहे..
येमुल गुरूजींचे राजकीय पासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांशी नजीकचे संबंध आहेत. आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडालीय. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्न ही करीत होते. त्यामुळे या प्रकरणात अंनिस ने उडी घेतली असून कारवाईची मागणी केलीय.
पीडित महिलेने सुरुवातीला चतु: श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानंतर गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्या विरोधात चार ते पाच गुन्ह्याची नोंद झाली आहे. चतु: श्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरल्या प्रकरणी अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमुल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. रघुनाथ येमुल हा स्वतःला अध्यात्मिक ग्रुप समजत असून त्याच्याकडे मोठ्या राजकीय व्यक्तींबरोबरच प्रतिष्ठित व्यक्तींची ऊठबस होती.. त्यामुळे त्याच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहे गणेश नानासाहेब गायकवाड?
गणेश नानासाहेब गायकवाड हे पुण्याच्या औंध परिसरात राहतो. प्रसिद्ध उद्योजक असून बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे.औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने,कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत.. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवड चे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत. गणेश गायकवाड यांची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
गणेश गायकवाड यांच्या लग्नामध्ये सासरच्या लोकांकडून मुलीच्या अंगावर 100 तोळे सोने, नवऱ्या मुलासाठी 50 तोळे सोने, 50 किलो चांदीचा रुखवत, एक कोटी रुपये हुंड्याची मागणी आणि लग्नानंतर मुलीला तिच्या गावापासून पुणे येथे हेलिकॉप्टरने घेऊन यावे अशी अट ठेवली होती. फिर्यादीच्या वडिलांनी या सर्व अटी पूर्ण केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.