पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गेली 65 वर्षे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा कुठे आयोजित केला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, यंदा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे महोत्सवासाठी शाळेचं मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचं डेक्कन एज्युकेशन सोसायटीने लेखी कळवलं आहे, अशी माहिती पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा आपले 66 वे वर्ष साजरे करणार आहे. गेली सुमारे तीन दशके हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे आयोजित करण्यात येत होता. यावर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी शाळेचं मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचं लेखी कळवलं आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या महोत्सवाच्या आयोजनापुढे जागेचीच समस्या उभी राहिली आहे.

अभिजात संगीताचा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा कार्यक्रम म्हणून या महोत्सवाकडे पाहिलं जातं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतिनिमित्त 1952 मध्ये या उत्सवाला प्रारंभ केला.

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने संगीत श्रवणाबरोबरच, सांगीतिक गप्पा, संगीतावर आधारित लघुपट, कलावंतांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन असे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. याबरोबरच,विद्यार्थ्यांसाठी सवलतीत तिकिटे, अंध मुलांसाठी संगीतश्रवणाची संधी यासारख्या गोष्टींमुळेही या महोत्सवाच्या दर्जात गुणात्मक वाढ करण्याचा प्रयत्न मंडळातर्फे सातत्याने करण्यात येत असतो.

यंदा महोत्सव तोंडावर आला असताना मैदान उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आल्यामुळे मंडळाला महोत्सव आयोजित करण्यासाठीच्या तयारीला कमी अवधी मिळणार आहे. शक्य त्या सर्व शक्यता मंडळाच्या वतीने आजमावल्या जात आहेत. पुढील माहिती रसिकांना तातडीने कळवण्यात येईल, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं स्पष्टीकरण

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कबड्डी, खोखो, योगासने आणि सूर्यनमस्कार, मल्लखांब, अथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, फूटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन अशा दहा खेळांच्या प्रशिक्षणांचा समावेश आहे.

त्यासाठी क्रीडा शिक्षकांची बैठक घेण्यात आली. त्यांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांची टीम तयार करण्यात आली. पालकांच्या बैठका घेण्यात आल्या. विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिरांसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग निश्‍चित करण्यात आला आहे.

त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांची मैदाने यापुढील काळात क्रीडा व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी भाड्याने द्यायची नाहीत, असा ठराव परिषद आणि नियामक मंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती एक महिन्यापूर्वी सवाई गंधर्व व्यवस्थापनाला लेखी कळवण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्याकडून देण्यात आलं आहे.