पुणे : पुण्यात आयोजित 'इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस'चं अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. अधिवेशनासाठी आवश्यक निधी आणि संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास असमर्थ ठरल्याचं कारण विद्यापीठाने दिलं आहे.


'इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस'चं अधिवेशन 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलं होतं. मात्र निधी उपलब्ध नाही आणि अधिवेशनालाठी पुण्यात येणाऱ्या इतिहास संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करणं शक्य नसल्याचं कारण विद्यापीठाने दिले आहे.

या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सदस्यांनी मात्र या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्व गेस्ट हाऊस बुक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु खेलो इंडिया कार्यक्रम आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन यातील तारखांमध्ये तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गेल्या काही काळात पुराणातल्या गोष्टी इतिहास म्हणून सादर करण्याला आणि त्याआधारे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याला विरोध होत आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रसने या गोष्टींना सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे हे अधिवेशन रद्द करण्यात आलं का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिवेशन रद्द झाल्यानंतर इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सदस्यांनी भरलेली प्रत्येकी दोन हजार रुपयांची फी परत मागितली आहे.