पुणे : मुंबई-पुणे प्रवासात लोणावळ्याला थांबून चिक्की न घेणारा प्रवासी तसा विरळाच. त्यातही चिक्की म्हटली की ती 'मगनलाल'चीच! मात्र चिक्कीप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या 'मगनलाल' चिक्कीपैकी एक 'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स' या कंपनीला चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत.


एफडीएला चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अन्न आणि सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याची नोटीस उत्पादकांना जारी करत कारवाई करण्यात आली आहे.

'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स' या कंपनीकडून उत्पादित करण्यात येत असलेली चिक्की मानवी आरोग्याला धोकादायक नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून चिक्कीची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे.
चिक्कीच्या पाकिटावरील मजकूरही बदलण्यास सांगण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या चिक्कीची तपासणी करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता बीकॉम इतकी आहे. त्यामुळे पात्र व्यक्तीकडूनच तपासणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तोपर्यंत चिक्कीची विक्री न करण्यासही सांगण्यात आलं आहे.

मगनलाल चिक्कीची सुरुवात करणाऱ्या मगनलाल अगरवाल यांच्या तीन मुलांच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत.  मगनलाल चिक्की या एकाच नावाने ते चिक्कीची विक्री करतात.  'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स' ही त्या तीनपैकी एक आहे.