Satyajeet Tambe : पाडव्या दिवशी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या घोषणेमुळं राजकीय अडचण होत असल्याची खदखद पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून जाहीरपणे मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची अडचण होत आहे. वसंत मोरेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या युवा नेत्यानं त्यांचं अभिनंदन केलं आहे. मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करुन लोकशाहीला साजेसं काम केलं असल्याचे काँग्रेसचे युवा नेते आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
   


नेमकं काय म्हणालेत सत्यजीत तांबे?


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची अडचण होतेय, कुचंबणा होतेय. पण पुण्याचे मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करुन लोकशाहीला साजेसं असं काम केलं आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी कोणत्याही एका जातीचा, धर्माचा, वर्गाचा किंवा परिवाराचा नसून तो संपूर्ण समाजाचा असतो. भलेही त्याला निवडून देणाऱ्या मतदारांमध्ये एखाद्या विशिष्ट समुदायाचं योगदान जास्त असेल, पण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्या वार्डातील किंवा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून त्याने काम करणं अपेक्षित असतं. जातीवरुन, धर्मावरुन अथवा इतर कोणत्याही मुद्यावरुन कोणताही भेदभाव करणं अथवा द्वेष, भीती निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टीला त्याने थारा द्यायचा नसतो. लोकशाहीतील या खूप महत्त्वाच्या मूल्याला वसंत मोरे जागले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. असे म्हणत सत्यजीत तांबेंनी वसंत मोरे यांचे अभिनंदन केलं आहे.


वसंत मोरे यांनी आणखी एक खूप महत्त्वाचा आदर्श आपल्या कृतीतून घालून दिला आहे. एखादी भूमिका जरी आपल्या पक्षाची, पक्ष नेतृत्वाची असेल आणि ती आपल्याला पटत नसेल, आपल्या विचारसरणीशी विसंगत असेल, लोकशाही व संविधानाच्या मूल्यांशी विसंगत असेल तर त्याला नक्कीच विरोध केला पाहिजे. वसंत मोरे यांच्या या कृतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. कारण, चुकीच्या गोष्टींना चूक म्हणण्यासाठी खूप मोठे वैचारिक, नैतिक धैर्य असावे लागते. माझे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्यांनी देखील अशा पद्धतीने पुढे येऊन लोकशाही बळकट करण्यासाठी आपली भूमिका मांडली पाहिजे. हेच सजग नागरिक आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले होते वसंत मोरे?


वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नसल्याचे  सांगितले आहे. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतू, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.



काय म्हणाले होते राज ठाकरे?


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील  भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे मनसेतून ही नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: