पुणे: पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (वय 55) यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सतीश वाघ यांच्यावर अपहरण केल्यानंतर चालत्या कारमध्ये चाकूने तब्बल 72 वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. तर त्यांच्या अपहरणानंतर कारमध्येच त्यांच्यावर वार केले त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला होता. तर ज्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले त्यानंतर ते भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.
हत्यार भीमा नदीत टाकले
सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपी नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून वाघ यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार हे पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रामध्ये फेकून देण्यात आले आहे. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून त्या हत्याराचा शोध घेऊन ते जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.पोलिसांनी पवन श्यामसुंदर शर्मा (वय 30, रा. काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 31, रा. गणेश नगर, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय 28, रा. बजरंगनगर, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय 32, रा. विघ्नहर्ता सोसायटी, फुरसुंगी फाटा) यांना अटक केली आहे.
वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकलं
नऊ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून चौघांनी त्यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वाघ यांच्या अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली होती.
सहा महिन्यांपासून पतीला संपविण्यासाठीची तयारी
हडपसरमधील शेतकरी, हॉटेल व्यावसायिक असलेले सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला बुधवारी (दि. 26) रात्री अटक करण्यात आली आहे. पत्नीनेच वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून समोर आलं आहे. मोहिनीने अक्षय जावळकरच्या मदतीने सतीश वाघ यांचा सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणली. मोहिनी वाघची सहा महिन्यांपासून पतीला संपवण्यासाठीची तयारी सुरू होती. अक्षय बरोबरच्या अनैतिक संबंधाबद्दल पतीला समजले. त्यानंतर तिने अक्षयलाच पतीला मारण्याची सुपारी दिली. याप्रकरणात, मोहिनीच्या सांगण्यावर अक्षयने त्याच्या साथीदार आरोपींना वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली होती अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.