पुणे: पुण्यातील भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंगवणे घाटात आढळून आला. या प्रकरणात पोलिसांची अनेक पथकं तपास करत आहेत. दरम्यान काहींना या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात देखील घेण्यात आलं होतं. काल (मंगळवारी) रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पवन शर्मा आणि नवनात गुरसाळे असं ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यानंतर आज आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime News)
आत्तापर्यंत चार जण ताब्यात
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या आणखी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. ज्या गाडीत सतीश वाघ यांचे अपहरण केले होते, त्या गाडीत आणखी 2 जण होते. आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला आणि नंतर त्यांचा मृतदेह हा शिंगवणे घाटात फेकून दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांची विविध पथकं या खून प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune Crime News)
पोलिसांनी या प्रकरणी माहिती देताना, 'सतीश वाघ खून प्रकरणातील कारवाई आणि तपास प्रगती पथावर आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली जात आहे. तसेच सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 16 पथक रवाना करण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादवा वाघ (वय 55 वर्षे) यांचं सोमवारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. काल (सोमवारी दि. 9) सतीश वाघ यांचा सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळला. सोमवारी, सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले.
सतीश वाघ यांचे अपहण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची खंडणी किंवा मागणी केली नाही. अपहरण केल्यानंतर काही तासांमध्येच सतीश वाघ यांचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे त्यांचा खून नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27 वर्षे) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. यासाठी पोलिसांची पाच पथकं देखील तयार करून वेगाने तपास सुरू केला आहे.