Pune Accident Update: राज्यात निष्काळजीपणे वाहनं चालवण्याचं प्रमाण वाढलं असून कुर्ला अपघातानंतर रस्त्यावर चालायचं की नाही या टोकापर्यंत आले आहेत. दरम्यान, पुण्यात सोमवारी भरधाव वेगानं गाडी चालवत एका तरुणाने नाकाबंदीदरम्यान ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली आणि त्यांना काही अंतर फरफटत नेले. या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अर्णव पवनकुमार सिंघल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.मित्राच्या वाढदिवस असल्याने तो पुण्यात आला होता. सोमवारी त्याने मित्राकडे जाण्यासाठी एक गाडी भाडेतत्त्वावर घेतली आणि कोरेगाव पार्क मधून रात्री येत पुन्हा घरी जात असताना त्याला पोलिसांची नाकाबंदी असल्याचे दिसून आले. पोलिसांना बघून घाबरलेल्या सिंगलने थेट कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला धडक देत त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले आणि तिथून त्याने पळ काढला.
पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश
घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. सिंघलला पकडून त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.या घटनेत जखमी झालेल्या पोलिस अंमलदार दीपमाला नायर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉटेलमधून पार्टी करून घरी जाणाऱ्या भरधाव मोटारचालकाने बॅरिकेड॒सला धडक देऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यास फरफटत नेल्याची घटना सोमवारी घडली होती.
कुर्ला अपघातानं महाराष्ट्र हादरला
मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. या अपघातामुळं बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये भरधाव वेगात येत नाकाबंदीवरच महिला पोलीस कर्मचाऱ्यास उडवल्याच्या घटनेने निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्यावर प्रशासन ठोस उपाययोजना करणार आहे की नाही? असा सवाल केला जातोय.