पुणे : गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाला असल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर ठपका ठेवला नसल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी अहवालातील चार मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितल्याची माहिती आहे. 


पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी ससूनचा बहुप्रतिक्षित अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना सादर करण्यात आला आहे. अहवालाची प्रत पुणे पोलिसांनाही पोस्टाने पाठवली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा ससूनच्या सहा डॉक्टरांकडून तपास करण्यात आला. या आधी तीन समित्यांचे अहवाल आधीच सादर करण्यात आले असून त्यापैकी दोन अहवालात रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. 


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटअभावी गरोदर महिलेला उपचार नाकारण्यात आले होते. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने रुग्णालयाला तात्पुरता दिलासा दिला असल्याची माहिती आहे. 


उपचाराअभावी तनिषा भिसेंचा मृत्यू


गेल्या महिन्यात, 28  मार्चला दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनानं भिसे कुटुंबाकडून 10 लाखांची मागणी केली. त्याशिवाय उपचार करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या तनिषा यांचा 31 मार्चला दोन मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. जन्माला आलेली ती दोन मुलं आईला पोरकी झाली आणि आता भिसे कुटुंबही या सगळ्या प्रकरणात होरपळतंय. 


डॉ. घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनची क्लिन चिट


पुण्यातील प्रकरणात मेडिकल असोसिएशनने डॉ. घैसास यांना क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणं चुकीचं आहे. संबंधित गर्भवती महिलेला आतापर्यंत योग्य ट्रीटमेंट दिली होती. शिवाय ट्रीटमेंट देत असताना काही सूचना वेळोवेळी केल्या होत्या. अॅडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केलं असं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलंय. 


डॉ. घैसास यांना पोलिस संरक्षण 


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी, डॉ. सुश्रूत घैसास यांना पुणे पोलिसांनी संरक्षण देण्यात आलं आहे. डॉ. घैसास यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा एक कर्मचारी तैनात असणार आहे. डॉ. घैसास यांना येत असलेले धमकीचे फोन आणि त्यांनी पुण्याबाहेर जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांकडून हे संरक्षण पुरवण्यात आल्याची माहिती आहे.