मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना 2020 वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. शरणकुमार यांच्या‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शरणकुमार लिंबाळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सरस्वती पुरस्कार 2020 ज्या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे ती 'सनातन' ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर आधारित आहे. देशातील स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकताना दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान प्रकर्षाने पुढे आले नाही. सनातन कादंबरीमध्ये दलित आणि आदिवासींच्या योगदानाचा उल्लख आहे.
40 पेक्षाही अधिक पुस्तकाचं लेखन
शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर 40 पेक्षाही अधिक पुस्तके आहेत. यामध्ये अक्करमाशी, उद्रेक, उपल्या, ओ, गावकुसाबाहेरील कथा, झुंड, दंगल, दलित आत्मकथा - एक आकलन, दलित पँथर, दलित प्रेमकविता, दलित ब्राह्मण, दलित साहित्य आणि सौंदर्य, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, पुन्हा अक्करमाशी, प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र), बहुजन, ब्राह्मण्य, भारतीय दलित साहित्य, भिन्नलिंगी,राणीमाशी , रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल,वादंग, विवाहबाह्य संबंध नवीन दृष्टिकोन, शतकातील दलित विचार, साठोत्तरी मराठी वाड्मयातील प्रवाह, सांस्कृतिक संघर्ष, साहित्याचे निकष बदलावे लागतील, हिंदू, ज्ञानगंगा घरोघरी या साहित्याचा समावेश आहे.
सरस्वती पुरस्काराने सन्मानित होणारे मराठीतील तिसरे साहित्यिक
मराठीमध्ये 1993 मध्ये विजय तेंडुलकर यांना त्यांच्या कन्यादान नाटकासाठी आणि 2002 मध्ये महेश एलकुंचवार यांना त्यांच्या युगांत या नाटकासाठी सरस्वती पुरस्कार मिळाला आहे. 1991 मध्ये पहिल्याच वर्षी हरिवंशराय बच्चन यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.