पुणे : वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकरांची ही भूमिका वैयक्तिक आहे. आम्ही शासनाच्या नियमानेच बीज सोहळा पार पाडणार आहोत. असं म्हणत बंडातात्यांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन देहू संस्थानने केलं होतं. तसेच आज तुकोबा महाराज असते तर त्यांनी शासनाची भूमिका मान्य केली असती, असंही नमूद केलं. आळंदी देवस्थानाने देखील शासकीय नियमांच्या अधीन राहूनच बीज सोहळा पार पाडणार अस म्हटलं. मात्र, तरीही बंडातात्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी आज भजन सत्याग्रह आंदोलन केलंच.


तुकोबारायांनी कोरोनाला तंबी दिली, खबरदार : बंडातात्या कराडकर


सर्वांना कोरोनाची भीती आहे. इथं जर आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो तर पुढे निगेटिव्ह होण्याची भीती आहे. या निगेटिव्हचा अर्थ थोडा वेगळा आहे. ही सगळी भीती बाळगून हा आमचा वारकरी इथं आलेला आहे. जीवावर उदार होऊन हा वारकरी इथं आलाय. कोरोना झाला तरी चालेल पण या आंदोलनात सहभागी होणार या निष्ठेने आलेला आहे. पण इथे आलेला एकही वारकरी कोरोना पॉझिटिव्ह होणार नाही याची ग्वाही मी आपल्याला देतो. सगळे म्हणतील माझं डोकं फिरलंय का? तर माझं डोकं फिरलेलं नाही. मी रात्री तुकोबारायांना विनंती केली, भाविक तुमच्यासाठी इथं येतायेत. कृपा करून एक दिवसासाठी कोरोनाला थोडी तंबी द्या. तेव्हा तुकोबारायांनी देखील कोरोनाला तंबी दिली, खबरदार उद्याच्या आंदोलनात आलास तर. "तुकाराम तुकाराम नाम घेता, कापे यम." अरे यम कापतो तिथं कोरोनाचे काय घेऊन बसलाय. म्हणूनच गेली वर्षभर मी मास्क न घालता आहे. त्यामुळे माझं चॅलेंज आहे. माझ्यापासून कोणाला कोरोना होणार नाही आणि कोणापासून मला कोरोना होणार नाही. हा मी शब्द देतो, कारण माझ्या अध्यात्माची ताकद आहे, असं बंडातात्या कराडकर म्हणाले.


आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय : बंडातात्या कराडकर


जोपर्यंत आत सोडत नाही, तोपर्यंत इथेच बसणार होतो. मात्र, शासनाला वेठीस न धरता आम्ही सर्वांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय, असे सांगत बंडा तात्या कराडकर यांनी आजचं आंदोलन स्थगित केलं. यावेळी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कराडकर यांनी केला. नांदेड मधील गुरुद्वारा मंदिर एकही दिवस बंद पडले नाही. कारण त्यांची एकी आहे. देहूकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना समजून सांगायला हवं होतं. पायी चालत देहूत येणाऱ्यांचा देहूकरांना विसर पडला. वारकरी धर्म मानवता धर्म पाळतो, हा मानवता धर्म पोलिसांना कसा काय आवडला. पण दारूची दुकानं सुरू ठेवणं आणि त्यांच्याकडून हफ्ते घेणे हे कोणत्या मानवता धर्मात बसतं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सध्या मुंबईतील शंभर कोटींच्या खंडणीचा विषय आहे, हे कोणत्या मानवधर्मात बसतंय हे पालकमंत्र्यांनी (अजित पवार) सांगावं, असा टोलाही त्यांनी लगावला. 


ज्यांनी आमच्या भूमिकेला विरोध केला त्यांना प्रश्न आहे. आषाढी वारी पायी झाली पाहिजे का नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही देहूच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार नाही, आम्हाला फक्त देहू गावाला प्रदक्षिणा करायची परवानगी द्या. कोरोना झाला तरी चालेल पण आंदोलनात सहभागी होणार, असं म्हणून आलेल्या वारकऱ्यांचे आभारी आहे. मी शब्द देतो मला कोरोनाची लागण होणार नाही आणि माझ्याकडून कोणाला कोरोना होणार नाही. कारण  माझ्या अध्यात्माची ताकद असेही शेवटी बंडातात्या कराडकर म्हणाले.