पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. संपूर्ण पुणे यामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद होते. त्यानंतर आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर हळूहळू पुणे शहर पूर्वपदावर येताना दिसत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शहरातील उद्याने उद्यापासून (3 जून) पासून सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. त्यामुळे तीन जूनपासून पुणेकरांची लाडकी सारसबाग, संभाजी बाग आणि इतर उद्याने सर्व सर्वसामान्य पुणेकरांसाठी उघडी राहणार आहेत.


आयुक्त शेखर गायकवाड यांनी नवीन आदेश काढला असून आता 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. यातून अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने सुरू होतील. 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहतील.


मंदिर, मॉल, हॉटेल बंदच


लॉकडाऊनच्या चौथा टप्पा संपल्यानंतर केंद्र शासनाने मंदिर, हॉटेल, मॉल आणि सिनेमागृह उघडतील असे आदेश काढले होते. परंतु राज्य शासनाने काढलेल्या आदेशात हे उघडण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे पुण्यातील हॉटेल, मॉल, सिनेमागृह, मंदिरे बंदच राहणार आहेत.


देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध  टप्प्याटप्याने कमी होणार आहे.


Cyclone Nisarga निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास! पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांचं विश्लेषण